मन-विजय : भीती
“डॉक्टर, देशमुख बोलतोय. पाचच मिनिटांचं काम होतं तुमच्याकडे. येऊ का दवाखान्यात ?”
आठवड्यातून किमान एकदा तरी येणारा हा फोन. हे पाचच मिनिटांचे काम म्हणजे त्या गेल्या वेळी आपण भेटलो होतो तेव्हापासून आजवर आलेले ग्लुकोमीटर वरचे आकडे मला दाखवायचे आणि साठ–सत्तर प्रश्नांची सरबत्ती सुरु करायची.
“डॉक्टर, हे बघितलत का? नऊ तारखेला सकाळचे रीडिंग ९७ आलंय! नेहमी ९०च्या आसपास असतं हो. म्हणजे गोळी सूट होतीय ना नक्की? बदलायला नकोय ना?”
“म्हणजे तसा मी रेग्युलर माझी ब्लड–टेस्ट करत असतो पण माझी ब्लड–शुगर वाढली हे नक्की काय झाले की ओळखायचे? म्हणजे काहीतरी लक्षणे दिसून येतच असतील की!”
“डॉक्टर, नक्की किती शुगर असली की किडन्या फेल होतात ?”
“डायबेटीस मध्ये पायाला जरा जरी जखम झाली तरी पाय कापावा लागतो का ?”
देशमुख काकांच्या घरी सगळ्यांना डायबेटीस आहे – त्यांचे वडील पायाला इन्फेक्शन होऊन त्यातच वारले. एका चुलत भावाला किडनी–फेल्युअर मुळे डायलिसीस करावे लागते. पण बाकीचे २ भाऊ औषधे, व्यायाम आणि आहार यांच्यावर नियंत्रण ठेऊन आहेत आणि डायबेटीस चे निदान होऊन १०–१२ वर्षे झाली तरी त्यांचा आजार आजवर एकदाही बळावलेला नाही.
देशमुख काकांचा आजारही काही फारसा धोकादायक नाही – आणि कसा असेल हो? रोज सकाळी आणि जेवणानंतर काका रक्तातली साखर मोजतात – अगदी नॉर्मल रेंजमध्ये असेल पण कालच्यापेक्षा आज जरासुद्धा जास्त झाली असेल तर लगेच रात्रीचे जेवण कमी करतात. अगदी प्रसादाचा पेढाही खात नाहीत की साखरेचे नावही घेत नाहीत. इतकेच काय पण दर दोन महिन्यांनी किडनी, लिव्हर, कोलेस्टेरॉल अशा सर्व तपासण्या करून घेत असतात. त्या संगतवार मांडणे, त्याचा ग्राफ बनवणे, त्याचा सतत आढावा घेत राहणे यातच त्यांचा सर्व वेळ जातो – कारण एकच – कुणीतरी डोक्यात भरवून दिले आहे की ‘मधुमेह वाढला की तो एक तरी मुख्य अवयव निकामी करतो‘
आणि मग त्यातून सुरु होते ती ‘भीती‘!
…पण देशमुख काका हे केवळ एक प्रतिनिधी आहेत. अनेक मधुमेही लोकांचे – ज्यांना आपला डायबेटीस वाढेल; कितीही प्रयत्न केले तरी एकदिवशी तो एखादा अवयव निकामी करूनच सोडेल. डायबेटीस कडे दुर्लक्ष झाले की पाय गमवावा लागतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीत्या एकदिवस स्वस्थ बसू देत नाहीत. एक नाही पण या प्रकारच्या अनेक समजूती त्याच्यासारख्या लोकांच्या मनात अगदी खोलवर रुजलेल्या असतात आणि जीवनाचा सर्व आनंद त्या सकाळ–दुपारच्या ‘आकड्यां‘वर ही मंडळी अवलंबून ठेवत असतात.
याचा अर्थ काहीच काळजी घ्यायची नाही का?
घ्यायची ना! पण ‘काळजी घेणे‘ आणि ‘काळजी करणे‘ यातला फरक लक्षात घेऊनच!
“काका, नक्की कसली भीती वाटते तुम्हाला ?” मी शेवटी एकदा त्यांना विचारले.
“अहो भीती म्हणजे काय? तुम्हीच सांगा, साखर नियंत्रणात नाही राहिली की काय होऊ शकते ते! आमच्याच घरात दोन अनुभव आहेत – जीवाशीच खेळ आहे की हा डायबेटीस म्हणजे!” देशमुख काका सांगते झाले.
“काका, रक्तातल्या साखरेच्या अनियंत्रित प्रमाणामुळे काय काय होते ते जरी खरे असले तरी यातले सर्व काही मलाच होणार आहे आणि कुठल्याही क्षणी त्याची झडप आपल्यावर पडेल आणि आपण आपला जीव किंवा एखादा अवयव गमावून बसू – असा विचार सतत करून कसे चालेल ?” मी विचारले.
“तुम्हाला बोलायला काय जातंय हो! झालं काही तर भोगायचे मलाच ना!” देशमुख काकांना काही माझे म्हणणे पटत नव्हते.
“मान्य आहे – पण त्यासाठी रोज किती त्रास करून घेत स्वत:ला ? तो काय कमी आहे का? – तुम्हीच सांगा – गेल्या सहा वर्षात तुमची एकदा तरी शुगर प्रमाणाबाहेर गेली आहे का ? एकदा तरी तुमचे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन सहा च्या वर गेले आहे का? म्हणजे रोजची पातळी असो वा तीन महिन्यांची अॅव्हरेज पातळी असो – तुमची नेहमीच नियंत्रणात असते. तुम्ही रोज नियमित व्यायाम करता, आहार सांभाळता, औषधे वेळेवर घेता – मग ही अनावश्यक काळजी कशासाठी? – आणि त्यामुळे आयुष्यातल्या छोट्या–मोठया अशा किती आनंदाला तुम्ही नाकारता हे पाहिलं आहात का कधी?”
“म्हणजे हो काय?” देशमुख काका जरा तरी ऐकण्याच्या मन:स्थितीत आल्यासारखे वाटले.
“अहो हेच बघा! परवा काकू सांगत होत्या की महेश काळेच्या मैफिलीला तुम्ही गेलात आणि अगदी रंगात आलेली मैफल अर्धवट सोडून घरी आलात – का तर तुमची जेवणाची आणि औषधाची वेळ चुकू नये म्हणून! एखादा दिवस चुकली वेळ, झाला तास–दीडतास उशीर तर काय बिघडलं ? – दुसरं – तुमचा भाचा दहावीच्या परीक्षेत शाळेत पहीला आला व संस्कृतमध्ये तर त्याला सुवर्णपदक मिळाले – पण त्याचा पेढा तुम्ही कणभरही खाल्ला नाहीत – कसे वाटले असेल त्याला ?”
“अहो डॉक्टर पण…”
“तुम्हीच सांगा देशमुख काका, सहा वर्षे कसोशीने नियंत्रणात ठेवेलेला डायबेटीस असा एका क्षणात जीवघेणा होईल का? आणि त्या भीतीपायी तुम्ही जो आनंद नाकारताय त्याची तुलना केली तर ही अनावश्यक भीती तुम्हाला किती महागात पडत आहे ते तुमचे तुम्हीच ठरवा!”
“मग करू तरी काय?” काकांनीविचारले
“फार काही नाही हो! पुढे काय होईल, नशिबात उद्या काय वाढून ठेवले आहे यावर फुकाचा विचार न करता आत्ता या क्षणी जीवनातला आनंद कसा घेऊ शकतो त्याचा विचार करा. वाढली जराशी शुगर अशाने तर मी बघून घेईन! आणि माझी खात्री आहे की या दडपणाच्या तावडीतून तुम्ही जर स्वत:ची सुटका करून घेतलीत तर आत्ता आहे त्याही पेक्षा जास्त चांगले नियंत्रण राखू शकाल – आणि ते ही आवडीचे सर्व काही करून!”
“थोडक्यात काय? आता तुम्ही सांगेपर्यंत साखर तपासायची नाही!! हो ना?” देशमुख काकांच्या चेहऱ्यावर हलकीशी ख़ुशी दिसत होती आणि एक हात टाळी घेण्यासाठी त्यांनी पुढे केला होता.
“अगदी बरोबर!!” मी त्यांना टाळी देत म्हणालो.
डॉ. अमित करकरे
समुपदेशक व होमिओपथी तज्ञ
९८२२२५२५३३