काय सांगता आणि कसं सांगता सुद्धा!

व्हाट्सअप वर चोवीस तास कुठल्या न कुठल्या ग्रुपवरून ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा आपल्यावर सुविचार आणि शहाणपणाचा वर्षाव करत असतो. ‘अतीपरीचयात अवज्ञाया उक्तीप्रमाणे आता बरेचदा आपण अनेक पोस्ट्स न वाचताच पुढे जातोपण परवा एक खूप छान पोस्ट वाचनात आली आणि समुपदेशनातील, विशेषतः पालकांशी बोलताना ज्याची सतत चर्चा होत असते अशा, एका मुद्द्याची त्या वाक्याशी सांगड घातली गेली. ते वाक्य असं होतं

मतभेद हा भांडणाचा १० टक्केच भाग असतो, बाकी ९० टक्के भांडण हे ते मतभेद मांडले कसे जातात यावर उभं असतं

केवळ मतभेद किंवा भांडणच नाही तर एखाद्याला त्याच्याच फायद्याची गोष्ट सांगतानाही याचाच प्रत्यय येतो, नाही का?

आता हे उदाहरण बघासुजयला चारचौघात मिसळायला जरा वेळ लागतो, बरेचदा लाज वाटते आणि म्हणूनच आता नववीत गेला तरी त्याला एकही जवळचा मित्र नाही, कारण कुणी बोलावलं तरी हा कुणाच्या घरी जात नाही. आपल्याला सगळे चिडवतील, खिल्ली उडवतील याचीच भीती त्याला सतत वाटत राहते आणि तो स्वतःला अजून अजून कोंडून घेतो आपल्या खोलीत.

अशावेळी सुजयला काय सांगाल असा प्रश्न नाही विचारणार मीउलट, तुम्ही जर सुजयच्या जागी असता तर पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सांगितल्यावर तुम्हाला या समस्येवर मला मात करण्याबद्दल आत्मविश्वास वाटेल ते सांगा मला!

पहिला मार्ग:

सुजय म्हणजे नुस्ता घरकोंबडा!! कुणाशी बोलायचे म्हणले तर तोंडातून शब्द फुटेल तर शपथ! एखाद्याशी जाऊन बोल म्हणलं कि काय धाड भरते देव जाणे याला, जणू तो दुसरा याला खाऊनच टाकणार आहे! अरे अशाने आयुष्यात पुढे कसा जाणार तू? तुला काय आयतं वाढून देणार आहे का कोणी ताटात रोज? कि कंपनी वाले दारात उभे राहणार आहेत नोकऱ्या घेऊन? घुमेपणाच्या बाबतीत अगदी बापावर गेलंय कार्ट! बघावं तेव्हा दोघांच्या तोंडाला कुलुप! घडाघडा बोललं आमच्यासारखं तर मन मोकळं होत आणि दुसऱ्याला कळतं तरी तुम्हाला काय हवंय ते! याला कधी समजणार देव जाणे! तोवर वेळ निघून गेलेली असेल! अरे ए मूर्खां, माझी तळतळ कळतीय का तुला? निदान मुंडी हलवून तरी हो म्हण!! बरं बोलावं तर आमचं तोंड दिसतं !”

नुसतं वाचताना सुद्धा नक्की कोणत्या टोन मध्ये बोललं जात आहे, सुजय आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर कसे भाव आहेत हे तुम्ही ओळखलंच असेल

आता, दुसरा मार्ग:

पहिल्यापासूनच नवख्या माणसाशी बोलायचं म्हणलं की सुजयला जरा प्रॉब्लेमच येतो. आम्ही बरेच प्रयत्न केले पण त्याचा हा लाजाळूपण किंवा भिडस्तपणा फारसा कमी झाला नाही. आता नववी-दहावी नंतर कॉलेजात जाणार हा, तिथे तर फारच अवघड होऊन बसेल अशानं! हा स्वभाव थोडा यांच्यातून आलाय त्याच्यात – पण कसा का आलेला असेना, त्यावर तोडगा त्याने काढायला हवा नाही का? कारण अशाने त्याचीच प्रगती खुंटेल. पण बदलायचा म्हणलं तरी लगेच थोडाच बदलतो स्वभाव कुणाचा. त्यालाही प्रॉब्लेम येतच असेल या वागण्याचा, त्यानेही प्रयत्न केलेच असतील आपापल्या परीने, पण त्याचा फायदा नाही झाला हे तितकंच खरं. थोडक्यात वेगळे किंवा अजून जास्त वेगाने प्रयत्न व्हायला हवेत आणि तो करेलही, किंवा त्याला करायलाच लागतील, कारण हा एक स्वभावगुण सोडला तर नाव ठेवण्यासारखं काही नाही सुजय मध्ये, आणि प्रत्येकात काहीनाकाही कमीजास्त असणारच! एखादा म्हणेल बदल घडवायला संपूर्ण आयुष्य पडलंय, पण जितका लवकर यातून बाहेर येईल तितका त्यालाच फायदा!”

या दुसऱ्या प्रकारात आवाजातला टोन किंवा चेहऱ्यावरचे भाव वेगळे असण्याचे मुख्य कारण म्हणजे कुठेही सुजयच्या स्वभावातली कमतरता झाकली किंवा लपवली गेलेली नाही, किंवा त्यावर पांघरूणही घातलेले नाही. कुणाला अवास्तव दोषही दिलेला नाही. खरं तर ‘असतं प्रत्येकात नाहीनाकाही असं’ असा भाव ठेवल्याने त्याच्या या स्वभावदोषाचा सर्वप्रथम स्विकार केलेला आहे आणि त्यातूनच त्याला ‘प्रयत्न केलेस तर यातून बाहेर येऊ शकतोस’ अशी आशा आणि विश्वासही दिलेला आहे. यावर मात ‘तुझ्याचसाठी तूच’ करायची आहेस हा ही विचार आहे. तुझ्याच हिताचे इतक्यावेळा मी सांगूनही तुला काहीच कसे समजत नाही (किंवा थोडे तरी समजायला’च’ हवे) असा अकारण अट्टाहासही येत नाही.

सहजी न बदलता येणाऱ्या गोष्टींचा स्विकार, त्यातून स्वतः व इतरांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होण्यास लागणाऱ्या वेळेबद्दलचा संयम, आजवर चाललेल्या प्रयत्नांवरचा विश्वास, आणि जरी एखादा दोष असला तरी फक्त त्यावरच लक्ष न देता इतर गुणदोषांसह संपूर्ण व्यक्तीला समजून घेण्याचा विवेकीपणा हाच स्वतःला आणि इतरांना चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करतो – आणि स्वभावातील गरज असलेले काही बदल घडवण्यासाठी सुद्धा!

फक्त हे कळलं असलं तरी प्रत्येकवेळी वळायला थोडा वेळ लागेल अापल्याला.

पण प्रयत्नांनी जमेल नक्की.

हेच तर शिकलोय अात्ता!