मन-विजय: नैराश्य

डॉक्टर मी शिल्पा बोलत आहे. तुमची पेशंट. माझ्या भावाला तुमच्याकडे घेऊन यायचे आहे. गेले वर्षभर तो डिप्रेशनमध्ये आहे. अलोपथिक औषधे देऊन पाहिली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट या डिप्रेशनमुळे त्याला डायबेटीस झालाय चाळीसाव्या वर्षी. मला वाटतं की तुम्हाला एकदा दाखवावे. मागे मला टेन्शन यायचे तेव्हा तुमच्या कौन्सेलिंगमुळे फार फरक पडला होता. कधी घेऊन येऊ?”

आज सकाळीही चालेल. माझे एक लेक्चर होते ते रद्द झाले आहे.”

ठरल्याप्रमाणे शिल्पा तिच्या ४० वर्षांच्या भावाला घेऊन आली. चाळीशीचा असला तरी पन्नासपंचावन्नचा दिसणारा विवेक अगदीच खंगला होता. वजन कमी झाल्याच्या खुणा दिसत होत्या. डोळ्यात अगदीच निस्तेज भाव दिसत होते. डॉक्टरला भेटण्यासाठी अगदीच निरिच्छा नसली तरी शिल्पाने ढकलल्यामुळेच तो आज माझ्याकडे आला होता असे वाटले.

डॉक्टर, गेल्या दिवाळी पासून हा असा आहे. आज सव्वा वर्ष झाले. मार्चमध्ये आम्ही याच्या सर्व तपासण्या केल्या तर शुगर वाढलेली. औषधे ही नीट घेत नाही आणि वजन बघा किती कमी झालय. इन्फोसिस मधे नोकरी आहे पणचालू आहेइतकीच. पूर्वीसारखा जोम आणि उत्साह नाही. एक दिवस काढून टाकतील अशाने! “

आजकालच्या स्पर्धा आणि धकाधकीच्या जगात मनोकायिक आजार अर्थात (psychosomatic illnesses) चे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. मानसिक अस्वास्थ्यामुळे मायग्रेन, हायपो-/हायपर-थायरोईडीझम, डायबेटीस, सोरियासीस आणि अगदी कर्करोग होऊ शकतो असे सिध्द झाले आहे; पण त्यासाठी एकतर कारण तरी तसे गंभीर हवे किंवा एखादा ताण प्रदीर्घ काळासाठी असायला हवा. विवेकच्या बाबतीत यापैकी नेमके काय झाले असावे याचा मी विचार करू लागलो. आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे विवेकशी मोकळेपणाने बोलता यावे म्हणून मी शिल्पाला बाहेर बसायला सांगीतले.

विवेक, शिल्पा सांगत होती की दिवाळी पासून तू डिप्रेस्ड आहेस, वजन कमी झाले आणि मार्चमधे तपासण्या केल्या तेव्हा डायबेटीस सुरु झाला. पण नक्की असे काय घडले दिवाळीच्या दरम्यान ज्यामुळे तुला जीवनातला रस कमी झाला? मला मोकळेपणाने सांगशील का? म्हणजे आपल्याला त्यावर काहीनाकाही मार्ग नक्कीच काढता येईल. अगदी निर्धास्तपणे मन मोकळे करयातले काहीही शिल्पा किंवा तुझ्या घरच्यांना माझ्याकडून कळणार नाही.” – शेवटच्या वाक्यामुळे विवेकच्या डोळ्यात एकप्रकारची चमक आल्याचे मला जाणवले.

डॉक्टर, खरच कुणाला सांगणार नसाल तर तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे या डिप्रेशनमुळे मला हा डायबेटीस मुळीच झालेला नाहीये. उलट ऑफिसमध्ये एका हेल्थकॅम्पमधे सहज शुगर तपासली तर चारशेदहा निघाली. एचबीएवनसी नऊम्हणजे पक्का डायबेटीस. अहो आत्ता कुठे चाळीस वर्षांचा आहे मी. इतकी वर्षे परीस्थिती बिकट होतीगेली दहा वर्षे हा जॉब लागल्याने त्यातून बाहेर पडत होतो आणि पूर्वी राहून गेलेला आनंद आता उपभोगायचा तर हे निदान!! माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. आता आली का पथ्य आणि तपासण्यांचा ससेमिरा!! इतक्या वर्षांच्या उपासानंतर आज जेवायला मिळतंय तर आता नेमके आमचे तोंड शिवलेले!! माणसाने किती कमनशिबी असावं याला काही मर्यादा? म्हणजे आमच्या आयुष्यात कधी सुख बघायचेच नाही का आम्ही? एक छदाम आजवर गैरमार्गाने मिळवला नाही त्याचे हे बक्षीस? भ्रष्टाचारी नेते सुखाने लोळत आहेत आणि आमची ही कथा. नकोसेच वाटायला लागले सगळेपण घाबरून घरी काहीच बोललो नाही आधी. हळूच औषधे घेत राहिलो एका डॉक्टर मित्राकडूनपण फरक दिसेना. वजन कमी झाले म्हणून घरच्यांनी मार्च मधे पकडून तपासण्या केल्या तर डायबेटीस तेवढाच!”

नाव विवेक असून किती हे अविवेकी विचार ?

आपल्या आजूबाजूला असे अनेक विवेक हिंडत असतात. आजकाल चाळीशीच्या दरम्यान मधुमेहाचे निदान होणे फारसे दुर्मिळ राहिलेले नाही. अगदी तरुण वयात मधुमेह आपल्या शरीराचा ताबा घेऊ लागला आहेयाला कारण आजकालचे राहणीमान, वाढते ताण आणि पूरक आहारविहाराची कमतरता. पण यापेक्षाही घातक म्हणजे हे असे अविवेकी व अनावश्यक विचार. परिस्थिती दिसते त्यापेक्षा घातक, नकारात्मक व भीषण आहे असे वाटत राहणे, आपणच जगातले सर्वात कमनशिबी आहोत असे वाटत राहणे, आणि मग या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी करणे गरजेचे आहे ते सोडून भलतेच विचार चघळत हातावर हात घेऊन बसून राहणे. अशा विचारांनी आजार अजूनच वाढीस लागतो.

मधुमेहाचे निदान हे अनेकांसाठी नैराश्याचे कारण ठरते. आता यापुढे पथ्यौषधांचा फेरा सुरु होऊन आपल्या आयुष्यातील गोडवा कायमचा संपला या विचाराने अनेकांची झोप उडते. काही काळ गेला की या भावनांची तीव्रता कमी होते आणि नशिबाने बरेचसे या नकारात्मक स्थितीतून आपसूक बाहेर येतात. काही मात्र त्यात गुंतूनच राहतात आणि स्वत:चे आयुष्य उगाचच अवघड करून टाकतात. अशा लोकांच्या मदतीला येते ती – ‘रॅशनल इमोटीव्ह बिहेविअर थेरपी’ अर्थातच विवेकनिष्ठ विचारसरणी. आपल्या मनातल्या नकारात्मक भावनांना जन्म देणारे अविवेकी विचार शोधून त्यावर विवेकी प्रयत्नांनी केलेली मात हा या थेरपीचा गाभा. विवेकला याचीच सर्वात जास्त गरज होती.

“विवेक, तुला मधुमेह झाला आहे हे सत्य आहे व ते आता बदलणे आपल्या हातात नाही. अशा परिस्थितीत यापुढील आयुष्य कसे घालवायला आवडेल तुला? असेच नैराश्यात बुडून की प्राप्त परिस्थितीवर योग्यप्रकारे नियंत्रण व मात करून?”

“अहो डॉक्टर, मला काय हौस आहे का असे जगायची? पण माझ्या या खत्रूड नशिबाबद्दलचे विचार काही केल्या मनातून जात नाहीत.” विवेकच्या बोलण्यातली अगतिकता कळत होती.

“हे बघ विवेक, असे नकारात्मक विचार मनात आलेच नाही पाहीजेत असं मी मुळीच म्हणणार नाही, कारण तसे होणे हे पूर्णपणे तुझ्या हातात नाही. प्रत्येकाच्या मनात असे नकारात्मक भाव येऊ शकतात पण त्यांना किती महत्व द्यायचे व कसे दूर लोटायचे ते केवळ आपल्याच हातात असते. त्यावरूनच आयुष्यातील यशापयश ठरते. काही कारणाने डायबेटीस झाला हे मान्य आहे, हे काही डायबेटीस होण्याचे वय नाही हे ही ठीक, पण जर आपण त्यावर योग्य उपचारच नाही केले तर तो बरा कसा होणार? तू जे काही वागतो आहेस त्याने तो बरा होणे दूरच राहिले पण ‘डिप्रेशन’ नावाच्या वेगळ्याच व तितक्याच घातक आजाराला तू निमंत्रण देत आहेस हे न समजण्याइतका तू बुद्धू नाहीस.”

“मान्य आहे मला तुम्ही म्हणताय ते, पण मग करू काय? विचार नाही करायचा असं म्हणलं तरी ते येतातच!”

“ज्या क्षणी हे नकारात्मक विचार मनात येतील त्याच क्षणी आपल्या स्वत:शीच संवाद साधायचा. विचारायचे की या प्रकारच्या विचारांनी माझा काही फायदा होणार आहे का ? नसेल तर मला हे जाणीवपूर्वक थांबायला हवे. मोबाईल मध्ये आवडीची गाणी ठेव – जेव्हा निराशेचे विचार येतील तेव्हा लगेच गाणी ऐकायची. त्याही पेक्षा चांगला पर्याय म्हणजे व्यायाम! सरळ उठायचे आणि कानाला हेडफोन लाऊन चालायला जायचे. अशाने विचार थांबतीलच पण व्यायाम होऊन शुगरही कमी होईल.”

विवेकने या सल्ल्याचे तंतोतंत पालन केले, सर्वात प्रथम त्याने एका मधुमेह-तज्ञाचा सल्ला घेतला व औषधाची मात्रा निश्चित केली.  दोन महिन्यात त्याच्या तपासण्या नॉर्मल आल्या, वजन सुधारले, तजेला वाढला आणि मुख्य म्हणजे नैराश्याचे मळभ दूर झाले. आजही मनात नकारात्मक विचार येत नाहीत असं नाही, पण त्यांना कसे बाजूला करायचे ते आता त्याला चांगले माहित झाले आहे.